पाच दिवसीय मराठी भाषा कौशल्ये विकास कार्यशाळा उत्साहात संपन्न नागपूर :

August 28, 2026 Admin
पाच दिवसीय मराठी भाषा कौशल्ये विकास कार्यशाळा उत्साहात संपन्न नागपूर :

विद्यार्थ्यांच्या भाषिक अभिव्यक्तीला अधिक प्रभावी, समृद्ध आणि परिपूर्ण करण्याच्या उद्देशाने श्री निकेतन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, नागपूर येथे मराठी विभागाद्वारे आयोजित करण्यात आलेली पाच दिवसीय मराठी भाषा कौशल्ये विकास कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना भाषा, लेखन, संवाद आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी  कमला नेहरू महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. विनोद राऊत यांनी ‘संवाद कौशल्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. भाषा ही केवळ विचारांची देवाणघेवाण करण्याचे साधन नसून व्यक्तिमत्त्वाला आकार देणारी प्रभावी शक्ती आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. भाषेचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी उत्तम लेखनाइतकेच प्रभावी, स्पष्ट आणि सुसंवादी बोलणे आवश्यक असल्याचे त्यांनी विविध उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
प्रभावी संवादासाठी विचारांमध्ये स्पष्टता, योग्य शब्दांची निवड, प्रसंगानुरूप भाषा आणि आत्मविश्वास यांना विशेष महत्त्व असल्याचेही डॉ. राऊत यांनी सांगितले. केवळ बोलणे म्हणजे संवाद नव्हे, तर समोरच्या व्यक्तीचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून योग्य प्रकारे प्रतिसाद देणे हीदेखील प्रभावी संवादाची महत्त्वाची बाजू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दैनंदिन जीवनात तसेच शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात संवाद कौशल्य व्यक्तीच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, असेही त्यांनी नमूद केले.
दुसऱ्या दिवशी कामठी येथील समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी ‘शुद्धलेखन आणि मुद्रितशोधन’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मराठी भाषा शिकताना आणि तिचा व्यवहारात वापर करताना भाषेची शुद्धता जपणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लेखनातील लहानशी चूकही अनेकदा अर्थामध्ये बदल घडवून आणू शकते. त्यामुळे शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष न करता सातत्याने वाचन आणि लेखनाचा सराव करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मुद्रितशोधनाचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी लेखन पूर्ण झाल्यानंतर त्यातील अक्षर, शब्द, वाक्यरचना, विरामचिन्हे आणि आशय यांची काळजीपूर्वक तपासणी करणे गरजेचे असल्याचे नमूद केले. शुद्धलेखन ही भाषेच्या सौंदर्याची आणि शिस्तीची खूण असून, अचूक व शुद्ध लेखनामुळे व्यक्तीच्या भाषिक व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक प्रभाव पडतो, असे विचार त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले.
तिसऱ्या दिवशी महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख तथा कार्यशाळेचे समन्वयक प्रा. मुरलीधर गवळी यांनी ‘पत्रलेखन’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. पत्रलेखनाची संकल्पना, स्वरूप, प्रकार आणि पत्रलेखनातील विविध घटक यांची माहिती देत त्यांनी प्रभावी पत्रलेखनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. पत्र हे केवळ संदेशवहनाचे माध्यम नसून व्यक्तीच्या विचारांची, भावनांची आणि व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारे प्रभावी साधन असल्याचे त्यांनी सांगितले.
औपचारिक आणि अनौपचारिक पत्रांतील फरक स्पष्ट करताना पत्राचा मायना, विषय, संबोधन, मजकूर आणि शेवट यांसारख्या घटकांची योग्य मांडणी कशी करावी, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. प्रसंगानुरूप भाषा, नेमकेपणा आणि विचारांची सुसंगत मांडणी यांमुळे पत्र अधिक प्रभावी बनते, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
चवथ्या दिवशी प्रा. डॉ. वैशाली धनविजय यांनी ‘मुलाखत लेखन’ या विषयावर विशेष मार्गदर्शन केले. मुलाखतीची संकल्पना, स्वरूप, प्रकार, उद्दिष्टे, तंत्र आणि पूर्वतयारी याविषयी त्यांनी सविस्तर विवेचन केले. मुलाखत ही केवळ प्रश्नोत्तरांची प्रक्रिया नसून व्यक्तीच्या विचारविश्वाचा, अनुभवांचा आणि कार्याचा परिचय करून देणारे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुलाखत घेताना विषयाचा सखोल अभ्यास, संबंधित व्यक्तीची पूर्वमाहिती, नेमके आणि आशयपूर्ण प्रश्न तयार करणे तसेच संवादातील सहजता राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मुलाखतीतील प्रश्नांची क्रमबद्धता आणि योग्य शब्दयोजना यामुळे मुलाखत अधिक परिणामकारक बनते. आजच्या प्रसारमाध्यमांच्या आणि डिजिटल युगात मुलाखत लेखनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांनी या कौशल्यात प्रावीण्य मिळविण्यासाठी सातत्याने सराव करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यशाळेच्या समारोपीय दिवशी,  प्रा. कुमुद वाडबुधे यांनी ‘जाहिरात लेखन व व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर व्याख्यान दिले. आधुनिक स्पर्धेच्या युगात जाहिरात हे प्रभावी जनसंवादाचे महत्त्वपूर्ण माध्यम असून, कमी शब्दांत अधिक प्रभावीपणे आशय पोहोचविण्याचे कौशल्य जाहिरात लेखनासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जाहिरातीचे स्वरूप, महत्त्व, वैशिष्ट्ये आणि प्रभावी जाहिरात लेखनाची तंत्रे यावर त्यांनी प्रकाश टाकला. आकर्षक मथळा, नेमका आशय, प्रभावी भाषा आणि सादरीकरण यांमुळे जाहिरात अधिक परिणामकारक बनते, असे त्यांनी स्पष्ट केले. याचबरोबर व्यक्तिमत्त्व विकासासाठी आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, प्रभावी संवाद आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रभावी भाषिक कौशल्ये ही व्यक्तिमत्त्व विकासाची महत्त्वपूर्ण बाजू असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
पाचही दिवस विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत उत्स्फूर्त आणि सक्रिय सहभाग नोंदविला. विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना भाषा, लेखन आणि संवादाच्या विविध पैलूंचे सखोल ज्ञान प्राप्त झाले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या भाषिक अभिव्यक्तीला अधिक सक्षम आणि परिणामकारक दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यशाळेला महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मेधा कानेटकर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

Share: